लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक पॅकेजची घोषणा करणाऱ्या, मात्र त्याची विस्तृत माहिती आपल्या भाषणातून न देणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे.
मुंबई: 'कुठलंही कटू वास्तव किंवा कठोर निर्णय पंतप्रधान मोदी स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते अर्थमंत्र्यांवर किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर ढकलून देतात. त्यांना काही ठोस आणि स्पष्ट सांगायचंच नसतं तर ते टीव्हीवर लाइव्ह भाषणं का देतात आणि संपूर्ण देशाला गोंधळात का टाकतात,' असा परखड सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. हे आर्थिक पॅकेज नेमकं कसं असेल? त्याचं वाटप कसं केलं जाईल? याची माहिती अर्थमंत्री देतील, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. 'पंतप्रधान स्वत: वाईटपणा घेताना दिसत नाही. कुठलाही कटू निर्णय स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते इतरांवर सोडून देतात. कदाचित तो त्यांच्या प्रसिद्धी व्यवस्थापनाचा भाग असावा' असा टोला आंबेडकरांनी हाणला आहे. 'मोदींच्या आर्थिक पॅकेजमध्ये केवळ मध्यमवर्गाचा विचार केलेला दिसतो. असंघटीत क्षेत्रातील मजूर आणि स्थलांतरितांसाठी काहीही नाही. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मध्यमवर्गीयांना खूश करण्याकडे मोदी सरकारचा कल होता. आर्थिकदृष्ट्या अक्षम व कमकुवत लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. चौथ्या टप्प्यातही सरकारची हीच भूमिका कायम आहे,' अशी खंत आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
***