मोदीजी, हे सगळे देशासमोर आणा; काँग्रेस नेते राजीव सातव यांची मागणी


"चीनसोबतच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन अंचबित करणार"


मागील काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसकडून उत्तर मागितले जात असून, काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांनी सीमेवर काय घडत असलेल्या गोष्टी देशासमोर मांडण्याची मागणी केली आहे.


पूर्व लडाखमध्ये चीनच्या सैन्यानं घुसखोरी केल्यानंतर सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. मागील आठवड्यापासून दोन्ही देशात यावरून चर्चा सुरू आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. सीमेवर झालेल्या वादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याबरोबर माजी खासदार राजीव सातव यांनी यावरून मोदी सरकारकडे सीमेवरील मुद्दा देशासमोर आणण्याची मागणी केली आहे.


“चीनसोबतच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन अंचबित करणार आहे. मोदीजी, ही मन की बात नसेल पण देशाची बात आहे. तुम्ही देशासमोर सत्य आणलं पाहिजे. मोदीजी, भारताच्या सीमेवर काय होत आहे, हे सगळं देशासमोर आणा,” असं राजीव सातव यांनी ट्विट करून म्हटलं आहे.



  • नेमका वाद काय आहे ?


चीनच्या दादागिरी, वर्चस्व गाजवण्याच्या सवयीमुळे पूर्व लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या हद्दीमध्ये रस्ता बांधणीचे काम करतोय. पण ते चीनला मान्य नाही. त्यावरुन हा वाद सुरु झाला आहे. पॅनगॉंग टीएसओ तलावाच्या उत्तरेला भारताकडून रस्ता बांधणीचे काम सुरु आहे. त्यावर चीनने आक्षेप घेतला आहे. चीन दावा सांगतो तिथून बऱ्याच लांब अंतरावर हे काम सुरु आहे. चीनने त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागामध्ये रस्ता बांधला मग, आम्ही आमच्या भागामध्ये रस्ता बांधू शकतो अशी भारताची भूमिका आहे.


***