अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ल्यामुळे केरळमध्ये एका गर्भवती हत्तीला आपले प्राण गमवावे लागले. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आल्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. अखेरीस राजकीय स्तरावरही याची दखल घेण्यात आलेली असून, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, केरळ वन-विभागाच्या अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे हा प्रकार उजेडात आला.
हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना दिली. वन-विभागानेही मारेकऱ्यांचा शोध सुरु केला असून दोषी व्यक्तींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. “नेमकी ही घटना कधी घडली हे सांगता येणार नाही, पण आमच्या अंदाजानुसार २० दिवसांपूर्वी हत्तीणीने हे फळ खाल्लं असावं. भुकेमुळे तिची झालेली अवस्था आणि वेदना सहन होत नसल्यामुळे ती ज्या पद्धतीने धावपळ करत होती यावरुन हा अंदाज बांधण्यात आला आहे.” केरळचे स्थानिक वन अधिकारी आशिक अली यांनी NDTV शी बोलताना माहिती दिली.
वन-अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये स्थानिक शेतकरी रानडुकरांपासून शेताचं संरक्षण व्हावं यासाठी फटाक्यांनी भरलेल्या अननसाचा वापर करतात. हत्तीण अन्नाच्या शोधात जंगल सोडून जवळील गावात शिरली होती. याचदरम्यान हत्तीणीने हे फळ खाल्लं असावं असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. २७ मे ला हत्तीणीने आपले प्राण सोडले, त्याआधी दोन दिवस केरळमधील वन अधिकाऱ्यांना या प्रकाराबद्दल समजल्याचं कळतंय.
फळाचा स्फोट झाल्यानंतर, काही वेळाने ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली. मोहन क्रिश्नन यांच्या मते आपल्या जखमेवर माशा किंवा इतर किटक बसू नयेत यासाठी हत्तीणीने आपली सोंड पाण्यात बुडवली होती. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दोन Rapid Response Team मागवल्या होत्या. मोहन याच टीमचे सदस्य होते. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणलं, पण तरीही या हत्तीणीने बाहेर न येणं पसंत केलं. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतू अखेरीस दुपारी ४ वाजल्याच्या दरम्यान हत्तीणीने आपले प्राण सोडले.
***