सदर ले़ख लिहिण्याचे कारण येणाऱ्या काळात नाभिक समाजातील युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आहे सदर लेख हा नाभिक समाजाची कुठे टिंगल-टवाळी होऊ नये व बदनामी होऊ नये यासाठी असुन आपण सतर्क राहण्यासाठी गरज आहे.त्याकरिता सदर लेखाचे लिखाण केले आहे.तरीही या लेखाच्या माध्यमातून काही जणांचे विनाकारण मन दुखेल तर त्यानी लेख सविस्तर वाचुन समजुन घ्यावा किवा बुध्दीजिवी वर्गातील समाज बांधवाकडून व्यवस्थितपणे समजुन घ्यावा.मी हा सदर लेख चांगल्या भावनेने लिहिला आहे. नाभिक समाजाची सध्या होत असलेली दशा बघून समाजाला नविन दिशा देण्यासाठी आपण आपली काही तरी जवाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक घटका समोर सध्या आव्हान आहे.आपण ते आव्हान स्वीकारले पाहिजे आणि ती आव्हाने स्वीकारून आपण समोर गेले पाहिजे हाच उद्देश डोळयाासमोर आपण ठेवला आहे.
हर तुफान जिंदगी को मुश्किल बनाने के लिये नही आता ! कभी कभी इससे रास्ते भी साफ हो जाते है!
तसेच आयुष्यात अपयश आणि पराभवही येणे ही गरजेचे आहे कारण यामुळे पेटून उठतो तो तुमचा स्वाभिमान आणि जागी होते ती जिद्द आणि मग उभा राहतो तो तुमच्यातील खंबीर आणि अभेद्य असा माणूस ! विचार एक विलक्षण शक्ति असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे .पण विचार बदलला तर नशीब बदलेल ! नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणूस जसे घडवेल तसे त्याचे नशीब घडत असते हेच खरे आहे !
येणाऱ्या काळामध्ये नाभिक समाजातील युवकांनी व बुद्धिजिवी वर्गांनी आपला वेळातला वेळ काढून समाजासाठी आपण काही तरी देणे लागते या विचाराने झपाट्याटून काम केले पाहिजे.
समाजातील घटकाचे कुठे जर चुकत असेल तर त्यांची चूक दुरुस्त करणे हे आपलेच काम आहे व जर चांगले काम करत असतील तर त्यांच्या पाठीवर यशस्वी किंवा अभिमानाने कौतुकाची थाप देणे हे ही आपलेच काम आहे.त्यामुळे आपण आता आपल्या नाभिक समाज बांधवांची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे.
- नाभिक समाजातील युवकां पुढील आव्हाने -
नाभिक समाजातील युवकांनी आता पांढरपेशी चोपड शिक्षण न घेता त्यांनी आता आपल्या शिक्षणात पुरोगामी परिवर्तनवादी विचारसरणीचे शिक्षण घेतले पाहिजे.नाभिक समाजातील युवकांनी आता हजामतीच्या धंद्यात पदार्पण करू नये.तसेच पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या कार्यक्रमात वेळोवेळी वेळ काढून हजेरी लावली पाहिजे.स्पर्धा परीक्षेची तयारी ठेवून नवीन छंद आपण जोपासले पाहिजे.छंदातून आपण आता रोजगार निर्माण केला पाहिजे.प्रत्येकाच्या अंगी नवीन कलागुण असतात.याकडे आपण लक्ष देऊन त्याला न्याय दिला पाहिजे.त्या कला आपण कृतीत उतरवल्या पाहिजे जेणेकरून आपला विकास साधला जाईल.इंग्रजी भाषेवर आपले प्रभुत्व असले पाहिजे.*
*नवनवीन भाषा,नवनवीन खेळ आपण शिकले पाहिजे व त्यातून आपलं करियर आपण डेव्हलप केले पाहिजे.तसेच कायदयाची L.L.B ही पदवी घेऊन स्वतः ला,कुटुंबाला व समाजाला सक्षम केले पाहिजे व अन्यायापासून वाचवलं पाहिजे.
- नाभिक समाजातील बुद्धीजीवी वर्गाची भूमिका-
नाभिक समाजामध्ये अत्यंत हुशार बुद्धीजीवी वर्ग आहे.पण तो आपल्या प्रपंचात गुंतला आहे (सगळेच नाहीत) जो आपला वेळ, पैसा ,बुद्धी व श्रम देतात त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व स्वागत पण केले पाहिजे.जे देत नाहीत त्यांनी आता तरी देण्याची मानसिक तयारी करावी.ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ दिला पाहिजे.पैसा असेल तर पैसा दिला पाहिजे* *समाजातील बुद्धिजीवी समाज बांधवांनी समाजातील व आपल्या कुटुंबातील भावा,बहिणी व जवळच्या नातेवाईकाकडे स्वतः लक्ष देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असावे.तसेच आपला समाज वंचित आहे व या घटकात शैक्षणिक मागासले पण आहे ते दूर करण्यासाठी आपण स्वता प्रयत्नशील असावे सध्या अनेक कर्मचारी बरेच ठिकाणी समाजासाठी झोकून देऊन काम करत आहेत त्यापैकी नांदेड, धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा आवर्जून उल्लेख येथे मला करावासा वाटतो.तसेच येथील महिला संघटन पण वैचारिक व सक्षमपणे एकुण एकाच्या हातात हात घालून काम करताना दिसते.तसेच प्रत्येक महापुरुषाची जयंती,स्मृतीदिन,सम्मेलन,स्पर्धा,सेवानिवृत्त कर्मचारी बांधवाचा सत्कार, शिक्षणापासून उपेक्षित व वंचित विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात ,जेष्ठ नागरिकांचा सन्मान,वि़धवा,घटस्पोटित महिलाना न्याय देतात व असे कार्यक्रम प्रामुख्याने घेताना दिसतात.
आपल्या कौशल्याच्या परिने जो तो समाज बांधव वंचित घटकांना योग्य दिशा व न्याय देण्याचे काम करतांना दिसतात.तसेच अडचणीमध्ये समाज बांधवांना मदत करताना नेहमी अग्रेसर असताना दिसतात.तसेच ते वेळोवेळी मुलांसाठी ,मुलींसाठी व महिलांसाठी स्पर्धात्मक नवनवीन खेळ व नवीन स्पर्धा ठेवतात. उदाहरणार्थ बुद्धिबळ व निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या कार्यक्रमातुन घेतलेले दिसते*
*नाभिक समाजातील युवकांची पालक म्हणून बुद्धिजीवी वर्गाने जबाबदारी घ्यावी.वेळोवेळी समाजातील होतकरू बुद्धिजीवी विद्यार्थ्यांना मदत करावी व त्यांची अडचण आपण समजून घ्यावी.*
नाभिक समाजातील नेत्यांची जबाबदारी -
नाभिक समाजात आज अनेक संघटना व नेते आज घडीला निर्माण झाले आहेत.त्याचे मनःपूर्वक स्वागत केले पाहिजे. त्यानी समाजाला पुरोगामी व परिवर्तनवादी विचाराची दिशा दाखवावी.वेळ प्रसंगी नेत्यांनी अंधश्रद्धा ,कर्मकांड, दैववाद व परंपरागत कामाला प्रखरपणे विरोध केला पाहिजे.ज्यांनी केला व करतात त्यांचे मनपूर्वक स्वागत त्यामुळे समाजाची प्रगती होईल.आज आपल्या समाजाला पुरोगामी परिवर्तन विचाराची अत्यंत गरज आहे.जर हे विचार आधी समाजाला मिळाले असते तर आज समाजाचा जो अपमान व यातना भोगत आहे त्या भोगाव्या लागल्या नसत्या.सोशल मीडियाच्या माध्यमातून जी समाजाची चेष्टामस्करी व बदनामी होत आहे ती बिलकुल झाली नसती आणि आज आपल्या समाजाला कोणा पुढे हात पसरवा लागला नसता.नाभिक असलेल्या समाजाला आज कोठे तरी हात पसरवा लागत आहे.आपल्याला कोणाकडे तरी आज मागण्याची वेळ येत आहे आणि मिडियाच्या माध्यमातून समाजाची भरपूर प्रमाणात टिंगल-टवाळी होत आहे.ही टिंगल-टवाळी ची वेळ आपल्यावर व आपल्या समाजावर येणाऱ्या काळामध्ये आली नाही पाहिजे.कारण गरिबी ही जळत नसते तर ती जाळावी लागते ती जर जाळली नाही तर ती आपल्याला जाळते! तसेच नाभिक समाजाच्या उद्धारासाठी नाभिक समाजाच्या नेत्यांनी नाभिक समाजाच्या युवकांना हजामतीच्या धंद्याकडे व महिलांना व मुलींना ब्युटी पार्लर कडे येण्याचे मार्गदर्शन ,आवाहान करण्या ऐवजी व सेमिनार घेण्याऐवजी स्पर्धात्मक व इतर क्षेत्रांमध्ये सक्षम बनण्यासाठी विविध तज्ञाचे मोलाचे मार्गदर्शनाचे शिबीर व कार्यक्रमाचे आयोजन करावे.
कारण आज आपल्याला व आपल्या समाजाला परिवर्तनवादी विचारांची गरज आहे आणि ही गरज परिवर्तनवादी विचारच भागवू शकतात.कारण सक्षम समाज व सक्षम नेतृत्व यातुनच घडत असते.
नाभिक समाजातील स्त्रियांसमोरील आव्हाने-
नाभिक समाजातील स्त्रीयांनी लग्नानंतर उच्च शिक्षण घेऊन नौकरी किंवा व्यवसाय (ब्युटीपार्लर सोडून) नवीन व्यवसायात पदार्पण केले पाहिजे तसेच जे बांधव कटिंगचा व्यवसाय करतात त्यांच्या पत्नीने मुलांच्या शिक्षणाकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे तसेच मुलांना शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात स्वतः घेऊन गेले पाहिजे.तसेच सक्षम पिढी निर्माण करण्याची जबाबदारी महिलांवर आहे.वेळेनुसार महिलांनी उच्च शिक्षण घेऊन कायद्याची म्हणजे L. L. B. ची पदवी घ्यावी त्यामुळे आपल्याला कायद्याचं ज्ञान मिळेल. त्याचा फायदा स्वतःला,कुटुंबाला व समाजाला होईल.आपण नव नवीन संशोधन केले पाहिजे.नविन ज्ञान आपल्यामध्ये आपण अपडेट ठेवले पाहिजे त्यामुळे आपला,आपल्या परिवाराचा व आपल्या समाजाचा उद्धार होतो कारण स्त्री हीच घराचा उध्दार करू शकते.
नाभिक समाजातील मुली समोरील आव्हाने-
नाभिक समाजातील मुलीनीं उच्च-दर्जाचे शिक्षण घेऊन स्वतःमध्ये,कुटुंबात व समाजात परिवर्तनाचे कार्य करावे नवनवीन शिक्षण आत्मसात करावे.आपल्या इच्छा अपेक्षा आपल्या आई वडिलांना मुक्तपणे सांगाव्यात नवरदेव निवडताना त्यांनी स्वतःची इच्छा पण आपल्या आई वडिलांकडे स्पष्ट बोलून दाखवावी.तसेच किमान पदवीधर तरी व्हावे शक्य असल्यास लग्नाच्या आधी किंवा लग्ना नंतर कायद्याची म्हणजे L. L.B. ची पदवी घ्यावी व आपले हक्क व अधिकार आपल्याला समजतील व त्यामुळे आपल्याला, कुटुंबाला व समाजाला आपण न्याय देऊ शकू.शिक्षण घेताना नवनवीन छंद आपण जोपासले पाहिजे नवीन काही आलेले कोर्स करावे (ब्युटी पार्लर सोडून) व आपल्या कला-गुणांना न्याय दयावा.इंग्रजी भाषेवर आपलं प्रभुत्व मिळवले पाहिजे व कराटे प्रशिक्षण घेऊन स्पोर्ट स्पर्धे कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
नाभिक समाजातील वडीलधारी मंडळीची जबाबदारी
आपल्या मुला व मुलीचे आपण छंद, इच्छा व आवड जपली पाहिजे त्याला बालपणापासून त्यांचे हक्क व अधिकार त्यांना दिले पाहिजे.त्याला आपण सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला वेळ दिला पाहिजे.तो आपण देण्यामध्ये कुठे तरी कमी पडतो.कारण सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आपण दुकानात राहतो तसेच आठवड्यातून एक सुध्दा सुट्टी आपण घेत नाही.आपण सुट्टी घेतली पाहिजे व आपल्या कुटुंबाला व समाजाला सुध्दा वेळ दिला पाहिजे.* *कुटुंबाला व समाजाला वेळ न दे़णे म्हणजे एक प्रकारचा कुटुंबावर व समाजावर अन्यायच आहे.आपण आपल्या कुटुंबासह ऐतिहासिक स्थळांना भेट दिली पाहिजे आपली प्रेरणास्थळ आपण आपल्या कुटुंबासहित बघितले पाहिजे उदाहरणार्थ प्रतापगड ,बांधवगड , सि़ध्दगड,माथेरान व पन्हाळगड बघितले पाहिजे.इतिहासाची पुस्तके वाचून मुलांना माहिती सांगितली पाहिजे. ऐतिहासिक इतिहास मुलांना समजून सांगितला पाहिजे.कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही त्यामुळे इतिहासाची आठवण झाली पाहिजे.तसेच आपल्या मुलाला जय जिवाजी असे अभिवादन समाजामध्ये गेल्यावर वरिष्ठ किंवा समाज बांधव व मित्र मंडळी भेटल्यावर आपण स्वता घालून त्यांला पण जय जिवाजी म्हणायला सांगावे.तसेच समाजात आपण स्वतः जाऊन समाज बांधवांची ओळख कुटुंबाच्या सदस्यांची ओळख करून दिली पाहिजे ते सार्वजनिक कार्यात गेल्यावर जसे लग्न वाढदिवस,मृत्यू, सावडणे व सामाजिक उपक्रमात घाई गडबड न करता पूर्ण वेळ थांबून सगळ्या समाज बांधवाची भेट घेऊन जय जिवाजी असे अभिवादन करून सगळ्यांची आस्तेवाईक पणे आपण चौकशी करून सामाजिक सलोखा वाढवून जीवनात प्रेम निर्माण करावे. तसेच आपल्या मुला-मुलींना उच्चशिक्षण द्यावे व तसेच आपल्या लहान मुलांना कटिंग च्या दुकानात अजिबात येऊ देऊ नये त्याला अधिकारी बनवावे.
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर कटिंग दाढी करताना घ्यावयाची काळजी-
आज घडीला देशात कोरोणामुळे संकट उभे राहिले आहे.यामध्ये सगळ्यात जास्त नुसकान आपल्या नाभिक समाजाचे झाले आहे. आपल्या समाजाची सगळया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या समाजाची खुप बदनामी झाली आहे आणि याचे अनेक व्हिडिओ सुध्दा व्हायरल झाले आहेत.तसेच गल्ली बोळात मैफिल मध्ये सुद्धा आपल्या समाजाची टिंगल टवाळी व बदनामी केल्या जात आहे.कुठे कुठे तर आपला व्यवसाय हा कसा घातक आहे व संसर्गजन्य रोग कसा पसरवु शकतो यावर सुध्दा खूप सविस्तर पणे चर्चा करून आपल्या समाजाला एक प्रकारे दोषी ठरविले जात आहे ही बिमारी कशी पसरते यावर सखोल चर्चा रंगल्या गेल्या आहेत.त्यातच दस्ती,वस्तरा,कंगवा व कैची याची उदाहरणे सुध्दा दिल्या गेली. सोशल मीडियाच्या माध्यमांतून अनेक उदाहरणे दिली आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्यावर व आपल्या समाजावर एक प्रकारे बदनामीचा शिक्का मारला गेला आहे.
आता नाभिक समाजातील कटिंगचे काम कऱणारानीं दुकानातील सामान व दस्त्या घरी घेऊन जाऊ नये व त्या घरी घेऊन गेले तरी काळजी घ्यावी.क़टीग दाढीचे काम करते वेळेस मास्कचा व हॅन्डग्लोजचा वापर करावा व दुकानात काम करायचे कपडे वेगळी ठेवावीत व वेळोवेळी सॅनेटायझरने हात धुवावेत.तसेच हातात अंगठी व धागा दोरा वगैरे असला तर तो सुद्धा स्वच्छ धुवावा.जेवण करते वेळेस स्वच्छ हात धुऊन जेवण व काही खायचे असेल तर खावे. संसर्गजन्य रोग असलेल्या लोकांची दाढी कटिंग करूच नये.
- आपण आपली सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे-
आपण सामाजिक जबाबदारी स्वीकारली पण पाहिजे. माझ्या समाजाने,संघटनेने व समाजातील नेत्यांनी मला व समाजाला काय दिले, काय केले यापेक्षा मी संघटनेला,समाजाला व नेत्यांला कधी वेळ ,पैसा,बुद्धी व श्रम दिले का? (दिले त्यांचे मनपूर्वक स्वागत) मग सामाजिक संघटनेला,समाजाला व नेत्यांला प्रश्न विचारण्याचा खरंच मला अधिकार आहे का ? सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करून नोकरी पेक्षा आपला धंदा चांगला आहे आपण खूप म्हणत होतो व ठासून सांगत होतो.मग एवढे इमानदारीने काम करून सुद्धा आपल्याला असे दिवस का आले ! मग काही बांधवावर अशी वेळ का आली ? शासनाला आपल्याला का मदत मागावी लागत आहे ? व आपल्या समाज बांधवांकडून राशन पाण्याची मदत आपल्याला का घ्यावी लागत आहे ? आज महाभयंकर अडचणीच्या वेळी आपण देशाच्या व समाजाच्या काय कामी पडलो ? आपण या कार्यात स्वतःला वाहून घेतले आहे का ? आपण सक्षम आहोत का ? हे असे अनेक प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे.
तसेच आपल्या समाज बांधवांनी घरोघरी जा़ऊन दाढी-कटिंग करू नये व घरी जाऊन कटिंग करणे आपण आता तरी बंद केले पाहिजे.तसेच येणाऱ्या काळामध्ये आपण एवढं सक्षम बनले पाहिजे की जेव्हा-केव्हा देशाला व समाजाला काही देण्याची गरज पडेल तेव्हा प्रधानमंत्री आपत्कालीन सहाय्यता निधी व मुख्यमंत्री आपत्कालीन सहाय्यता निधी या फंडांमध्ये सर्वात जास्त निधी देण्याच काम आपल्या समाजाच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मागणारा समाज दाखवल्या जातो त्याला छेद देऊन येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त मदत निधी देणारा आपला समाज म्हणून आपला नाभिक समाज असला पाहिजे अशी तयारी करू.
गाव कुसा बाहेर राहणारा पूर्वीचा महार बांधव व आजचा बौद्ध समाज बांधव यांनी आज फुले ,शाहू, आंबेडकर यांची परिवर्तनवादी विचारधारा स्वीकारल्यामुळे आज त्यांची प्रगती झाली.आज बौद्ध भिक्खू एक करोड, बुद्धिस्ट रेल्वे कर्मचारी सत्तर कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करुन दिली असे असंख्य उदाहरणे आहेत.पण सोशल मीडियाने ती समोर आणली नाहीत.बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जमा झालेली वर्गणी वंचित उपेक्षित बहुजन समाजाच्या उद्धारासाठी वापरण्यात येणार आहे. हे का शक्य झाले तर ते फक्त आणि फक्त परिवर्तनवादी विचारधारा स्वीकारल्यामुळेच.आज परिवर्तनवादी विचारधारा स्विकारलेला समाज ज्ञानाच्या जोरावर मी देशासाठी आणि समाजासाठी काही देऊ शकतो का हाच विचार करत आहे.तो या वेळी आत्तापर्यंत कुठेही मला व माझ्या समाजाला काही मिळेल का ? काही मागण्या च्या भूमिकेत अद्याप तरी दिसला नाही त्यांचे मनःपूर्वक स्वागतच केले पाहिजे त्यांच्या नेत्यांनी त्यांना योग्य मार्ग दाखवला.आपल्या समाजाच्या नेत्यांनीही आपल्या समाजाला आता तरी योग्य पुरोगामी परिवर्तनाचा मार्ग दाखवावा जेणे करून येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाला मागणारा समाज नाही तर देणारा समाज बनवावा आणि यामुळे माझा समाज कुठेही वाकणकर नाही. आता आपल्या समाजानेही पूर्वीचा वारिक समाज न राहता परिवर्तनवादी विचारांचा नाभिक समाज होणे ही काळाची गरज आहे.
सध्या काही ग्रुपवर जातीवादी फेक मॅसेज येत आहेत त्यामध्ये एका समाजालाच टार्गेट केले जात आहे त्यामध्ये आपण आपला सहभाग घेऊ नये.कारण कोणताही समाज हा 100% खराब नसतो.तसेच आज आपल्याही समाजाची अशाप्रकारेच मीडियाच्या माध्यमातून खुप बदनामी होत आहे.त्यामुळे आपल्या समाजातील काही बुद्धिजीवी व्यक्तींचे मन सुध्दा दुखत आहे व याचा मानसिक त्रास त्याना सुध्दा होत आहे व सहन करावा लागत आहे.त्यामुळे आपण थोडा विचार केला पाहिजे की सगळेच एखाद्या गैरकृत्यामध्ये सामील नसतात.
- म्हणून लक्ष दया -
जीवनात संकटे ही माणसाला मजबूत करायला येत असतात आणि या संकटापासून जर आपण शिकलो नाही तर आयुष्य बरबाद होते आणि जर शिकलो तर आपले जीवन हे सुखमय होऊन जाते पण संकटानंतर माणूस जर काही नाही शिकला तर माणूस आयुष्यभर गुलाम राहतो आणि आयुष्यभर गुलामी करतो आपल्यावर कितीही वाईट प्रसंग आला तर त्या वाईट प्रसंगात ही आपण स्वाभिमानाने आणि संघर्षाने उभे राहायला शिकले पाहिजे आणि आपल्याला लाचारी व गुलामीची सवय कधीच होऊ देऊ नये.कारण लाचारी व गुलामी ही माणसाला आयुष्यभर खाली बघण्याची वेळ आणते आणि आपण आपला स्वाभिमान गमावून बसतो.आपण संकटात संघर्ष नाही केला तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही आपण आपल्या पत्नीला व मुला बाळासमोर सुध्दा आदर्श ठरत नाही व उभे राहण्याच्या लायकीचे पण ठरत नाही आणि एक माणूस म्हणून आपण स्वतःच्या नजरेत जगण्यासाठी लायक ठरत नाही.
भाकर हे विचार निर्माण करू शकत नाही पण विचार हे भाकर निर्माण करू शकतात त्यामुळे आयुष्यभर भाकर देण्यापेक्षा विचार देणे महत्त्वाचा असते आणि जो विचार देतो त्याला परत कोणाला भाकर देण्याची गरज असत नाही त्यामुळे आयुष्यात विचार देण्याचे काम करा व विचार घेण्याचे काम करा तुम्हाला कधीच कशाची कमी पडणार नाही.
लेखक : सुभाष एस. बोरकर
जिजामाता नगर हिगोली ता.जि.हिंगोली
मो. नं. ९९२१४००५७७