......नाळ ........एक ग्रामिण कथा - राहुल रतन इंगोले


......नाळ ........



"आई, मला तहान लागली गं!." कौशी ची बारकी पोरगी कळवळून म्हणत होती. भर दुपारच्या प्रहरी मन्याचं कुटुंब गावातील दवाखान्यातून तपासणी करून शाळेवर अलगीकरणात राहण्यासाठी आलं होतं. पोरीची हाक एैकताच शाळं शेजारी असणाऱ्या रंजीच्या घरी कौशी पाण्यासाठी गेली, पण कौशिला पाहताच रंजीनं दरवाजा बंद करून घेतला.
 आपण शहरातून आल्यामुळं आपल्याला असं लोक वागत आहेत हे कौशीला कळून चुकलं होतं. तिला आता लेकराचा तहानेने व्याकूळ चेहरा पाहवत नव्हता. तिने आपल्या जवळची कळशी घेतली, शाळेच्या बाहेर गेली, होत्या नव्हत्या सर्व अवसानानं पाणी हापसुन पाण्यानं   भरलेली कळशी घेऊन पुन्हा शाळंकडं निघाली, तोच बाजूला लिंबाखाली बसलेल्या चार-पाच म्हातार्या कुजबूज करायला लागल्या. तोंडानं फटकाळ असलेली सया म्हातारी शेवटी न राहून म्हणालीच," काय गं कौशे, बिमारी हाय तोवर तिकडंच राहायचं असतं ना! कशाला बिमारी घेऊन आलीस.
तशी कौशी म्हणाली, ावं ात्या आपलं गाव हाय येनं तर लागल की."
 पानानं भरलेला तोबरा पाठीमागं थूंकत शांती म्हणाली, "अगं पण तिकडं शाळंतच थांबायचं ना! चार दिवस पाहू दे ना दुनिया, कशाला मारून टाकतीस". रिकामटेकड्या म्हाताऱ्या बायांचे मनाला टोचणारे टोमणे ऐकून कौशी चांगलीच संतापली. ाव आम्हाला काय बिमारी गीमारी काही नाही, तीकून येतानी पण  तपासणी करून आलो, आता गावात येऊन पण तपासलं. तिकडं काहीच काम धंदा नाही, म्हणून आलो आपल्या गावी. काही खायचं प्यायचं विचारायचं सोडून तुम्ही आम्हाला धुडकावुन द्याल्या. सकाळपासून लेकरांनं पाणी पिले नाही, भाकर नाही खाल्ली, म्हणून  पाणी नेण्यासाठी ालते. तुमच्या बिमार्या आम्हाला लागू नये, म्हणून तर थांबलो शाळेमध्यी."
  पाण्याने भरलेली  कळशी रागारागानं घेऊन शाळंकडं निघाली.
 मन्या आपल्या रडणार्‍या बारक्या पोरीला शांत करत होता. कौशीचा रागानं लाल चेहरा पाहून मन्या म्हणाला," काय गं काय झालं?" मरायच्या वाटंला लागलेल्या म्हाताऱ्या आम्हाला म्हणतात की, बिमारी घेऊन कामून आली गावात. त्यांच्या अंगात सत्रा बीमार्या  आहेत त्याचं काही नाही." कौशी मोठ्या रागाने बोलत होती. मन्या व कौशीने सोबतच्या शिळ्या भाकरी खाऊन शाळेच्या पत्राखाली दुपारची विश्रांती घेतली.
 दिवस मावळतीला जात होता. मन्यासारखेच बरेच जण रोजगार बुडाल्यामुळे गावी परतत होते. ग्रामपंचायत तर्फे सर्व बाहेरगावाहून आलेल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास दहा ते पंधरा कुटुंब शाळेवर वास्तव्यास आली होती. ग्रामपंचायतच्या माणसाने आणलेल्या चपात्या व वरन खाऊन सर्वजण शाळेच्या मैदानात आपापले आंथरुन टाकून पडले होते. गावातील लोक विचित्रपणे संरक्षक भिंतीवरुन  तर कुणी गेटमधून पाहत होते. 'एकमेकांच्या अंतर रहा बर का' असा कुणी फुकटचा सल्ला देऊन स्वतःचा मोठेपणा मिरवत होते. तर कुणी 'खाण्या-पिण्याची व्यवस्था ठीक आहे ना' असे विचारून मन शांती करून घेत होते. आता रात्रीचे दहा वाजले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. अशातच कारपीओ गाडी शाळेत दाखल झाली. सर्वांना गाडीचा आवाज ऐकून जाग आली. काहींना वाटले, 'डॉक्टर लोक आले असावे, तर कुणी सरपंच ग्रामसेवक विचारणा करण्यासाठी आले असावे, असा काहीतरी कानोसा घेत अंथरुणावर चुळबुळत होते. गाडीतून  दोन सुंदर मुली, एक दहा वर्षाचा मुलगा व पती-पत्नी उतरले. ते दुसरे तिसरे कुणी नसून तीस वर्षापूर्वी जत्रेत चुकलेला सुनील होता, जो आज पहिल्यांदाच बिमारीच्या भीतीने गावी परतला होता.



 35 वर्षापुर्वीची गोष्ट. कोंडबा हा मन्या व सुन्या या दोन मुलांसह पुण्यात कामाला गेला होता. बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. एक दिवस शहरात भरलेल्या जत्रेमध्ये कोंडबा सहकुटुंब सामील झाला होता. जत्रेत तुफान गर्दी होती. खेळण्याच्या दुकानावर कोंडबा खेळणे घेण्यासाठी थांबला. अचानक सुन्याचा हात हातातून सुटला. कोंडबास वाटले, असेल मन्या बायकोच्या हाताला धरून, आणि बायकोला वाटले असेल धन्याच्या हाताला धरून.
 पण सुन्या तसाच तेथेच खेळण्याच्या दुकानासमोर विसरला. कोंडबा व त्याची बायको तसेच पुढे गेले. परंतु दोघांना पण जेव्हा सुन्याची  आठवण झाली, तेव्हा मात्र त्यांच्या अंगातले अवसानच निघून गेले. जत्रेतील गर्दीत कोंडबाच्या काळजाचा तुकडा हरपला होता. कोंडबा व त्याची बायको सर्व जत्रेने सैरावैरा पळत होते. त्यांच्या नजरेला आता फक्त सुन्याची ओढ लागली होती. दिसेल त्याला कोंडबा व त्याची बायको "महा सुन्या दिसला का हो"? असे कळवळुन विचारत होते. काही सहानुभूती दाखवत होते, तर कोणी कोंडबाच्या बायकोकडे पाहून जिभल्या चाटत होते. कोंडबा व बायकोने सर्वत्र सुन्याची शोधाशोध केली, पण सुन्याचा काही शोध लागला नाही. शेवटी हताश झालेला कोंडबा आपल्या बायको व मन्या एका मुलासह गावी आला. सुन्याच्या हरवन्याने कोंडबाला भयंकर मोठा मानसिक धक्का बसला होता. त्याचे गावात पण कोठे मन लागत नव्हते. पण धीर सोडून चालणार नव्हते ,एक मुलगा व बायको यांच्यासाठी त्यालाच जगावच लागणार होतं. म्हणून गावातच लागेल ते काम करून कुटुंबाचा संसार गाडा तो वोढु लागला. परंतु सुण्याचि ऊणीव कोंडबाला ना जगू देत होती, ना मरू देत होती. अशातच कोंडबा बिमार पडला. त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या. कोणतेही औषध त्याच्यावर परिणाम करत नव्हते. कोंडबाचे कर्ण फक्त सुन्याचा आवाज ऐकण्यासाठी आतूर झाले होते. शेवटी सुन्याच्या विरहातच कोंडबा मरण पावला. कोंडबाच्या बायकोवर दुःखाचा डोंगर कोसळला. जत्रेमध्ये मुलगा व आता तिचं कुंकू सोडून गेलं होतं. काय करावे तिला कळेनासे झाले. सात आठ वर्षाचा मन्याच तिच्या जिवाचा आधार होता. मन्यासाठी तिला आता जगायचं होतं, मन्यासाठीच मरायचं होतं. दिवसामागून दिवस जात होते. लक्ष्मी ही कोंडबाची बायको. दिनरात कष्ट करून मन्याच्या जीवनाचे सोने करण्यासाठी झटत होती. मन्या पण अंगापिंडाने भरू लागला. कोंडबा सारखाच मन्या पण आता धिप्पाड देही, उंचापुरा एखाद्या पैलवानासारखा दिसू लागला. गावातच लागेल ते काम करून दोघे मायलेकरं जगत होती. लक्ष्मी आता उतार वयाला लागली होती. घरातील काम करताना देखील वार्धक्याने तिचे हात पाय लटपटू लागले. म्हणून लवकरच लक्ष्मिनं आपल्या डोळ्यादेखत मन्याचं लग्न लावून दिलं. मन्याच्या घरात आता सुखी खेळु लागलं. कौशी ही मन्याची कष्टाळू बायको. नवऱ्याच्या संसाराला हातभार लावू लागली. गावात काम नसल्यामुळे गेल्यावर्षी शहरात कामाला मन्या आपल्या म्हाताऱ्या आईला, बायकोला घेऊन गेला होता. पण पुढे कोरोना नावाच्या बिमारीने सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. एक दोन महिन्यात पुन्हा काम सुरु होईल या आशेने दोन महिने मन्या आपल्या म्हातार्‍या आई बायकोसह शहरात घरातच बसून राहिला. पण पुढे पुढे लॉकडाऊनचा कालावधी सरकारकडून वाढवण्यात येऊ लागला. शेवटी नाईलाजाने कधी पायी, तर कधी मिळेल त्या वाहनाने मन्या आपल्या अडीच तीन वर्षाच्या मुलीला बायकोला व आईला घेऊन गावात पोहोचला. प्रशासनाच्या नियमानुसार बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करून त्या सर्वांना शाळेवर ठेवण्यात आलं होतं. तोच हा मन्या होता.


 तिकडे ज्या दुकानावर सुन्या चुकला होता तेथेच काही काळ घुटमळला. 'आई,आई असा भयंकर आवाज दिला. भुकेने व्याकूळ पाच वर्षाचा मुलगा त्या दुकानाच्या अवतीभोवती आई-वडिलांना पाहू लागला. पण त्याला कुठे माहित होते की त्याचे आई-वडील व त्याची चुका चूक झाली होती म्हणून! सुन्या रात्रभर इकडेतिकडे भरकटला. 5-6 मीनीटे त्या खेळण्याच्या दुकानावर घालवलेली असल्यामुळे खेळण्याच्या दुकाना शिवाय सुन्याच्या मनाच्या जवळचे ठिकाण दुसरे कोणतेच नव्हते. आईवडीला विना व्याकुळ जीवाची घालमेल त्या दुकानदाराला पाहावली नाही. त्यानेच त्यांला सांभाळण्याचा विचार केला. आणि सुन्याचा आता जणु नवीन जन्म झाला होता. आणि त्या दुकानदाराच्या रूपाने त्याला नवीन आईबाप भेटले होते. सुन्या त्या दुकानदाराच्या घरीच राहू लागला. दुकानदाराला पण एकच मुलगी व एकच मुलगा असल्यामुळे त्याला पण सुन्याचा आधार झाला. जिथे जत्रा असेल, तिथे सुन्या दुकानदार सोबत जात ासे. दुकानदाराला पण आता आधार झाला होता. पाहता पाहता दिवस जाऊ लागले. सुन्या पण आता मोठा होऊ लागला. एकएक नवीन दिवस निघू लागला. सुन्यानं आता तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं. सुन्याच्या देखण्या रूपावर भाळुन एक मुलगी सुन्याच्या जीवनात कधी आली हे त्यालाही कळले नाही, व तिलाही कळले नाही.


 अस्मिता ही श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी. बापाची लाडकी असल्यामुळे तिचा प्रत्येक शब्द बापासाठी जनु वचनच होता. दिवसेंदिवस सुन्या व अस्मिताच्या प्रेमाची पालवी चांगलीच पल्लवित होऊ लागली.
 एक दिवस उदास असलेल्या अस्मिताला वडिलांनी विचारले, तेव्हा सुन्याविषयी अस्मिताने सांगितले. अस्मिता जेव्हा सुन्याला घेऊन घरी आली, तेव्हा फाटकी चप्पल, विस्कटलेले केस, मळकट कपडे, पिवळे दात असा सुन्याचा अवतार पाहून अस्मिताचे वडील भयंकर संतापले. आल्या पावलाने तसेच सुन्याला माघारी परत लावले. त्याला भयंकर अपमानीत झाल्यासारखे वाटले. त्याने अस्मिताच्या प्रेमा पासून खूप दूर जाण्याचा विचार केला. परंतु अस्मिता तर त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. सुन्याशिवाय ती जगूच शकत नव्हती. म्हणून अस्मीताच्या वडिलांनी मुलीच्या आग्रहाखातर सुन्यासोबत अस्मिताचे लग्न लावून दिले. अस्मिता एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या वडिलांच्या संपत्तीचा मालक अर्थातच सुन्या झाला. अस्मिताच्या वडिलांनी सर्व उद्योगाची धुरा सुन्याच्याच्या खांद्यावर दिली होती. सुन्या आता सुन्या नव्हता तर सुनील शेठ झाला होता.  सुन्याचा संसार चांगला चालू होता. पाहता-पाहता अस्मिता व सुन्याच्या संसारवेलीवर दोन मुली व एक मुलगा असे फुले उमलली. पाहता-पाहता पंधरा वर्षाचा कालावधी उलटला. अचानक कोरोना नावाच्या बिमारी ने सर्वत्र थैमान घातले. सुनीलच्या कंपनीतील सर्व कामगार आपापल्या गावी गेले. उत्पादन बंद झाले. दिवसेंदिवस त्या बिमारी ने अधिकच उग्र रुप धारण केले. प्रत्येक गल्लीबोळात सुद्धा रुग्ण सापडू लागले. बाहेर रस्त्यावर फिरणे हिंडणे बंद झाले. मुंगीसारखी माणसांची वर्दळ असणारी शहरं  निर्मनुष्य भासू लागली. जो तो आपला जीव वाचवण्यासाठी गावी परतू लागला. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णांची संख्या नगण्य होती. त्यामुळे कामगार बरोबरच अगदी उद्योगपती सुद्धा आपापल्या गावी जाण्याच्या विचार करू लागले. एकदा रुग्ण म्हणून दवाखान्यात नेले की त्याचे पुन्हा दर्शन होणे जवळजवळ अशक्यच, म्हणून सुनीलला पण आता गावी जाण्याचे वेध लागू लागले. पण जाणार तरी कुठे? पण विज्ञानाच्या युगात जन्मलेल्या सुनील च्या मुलींनी सुनील च्या सांगण्यावरून गावाचं नेमकं स्थान शोधून काढलं. इंटरनेटवरून त्या गावच्या सरपंच ग्रामसेवकांची संपर्क साधून रितसर पद्धतीने सुनील परिवारासह गावी आला. तो तसाच ग्रामपंचायतने शाळेवर कॉरंटाईन करण्यात आला होता. तोच हा जत्रेत चुकलेला सुनील होता.....
 स्कार्पिओ गाडीतून उतरलेल्या सुनील व कधी पायी व कधी वाहनाने चालत आलेला मन्या एकमेकांकडे नुसते पाहू लागले. एकाच बापाची लेकरं आज तीस वर्षांनी एकमेकांना भेटली होती. लक्ष्मी पण थकल्या डोळ्यांनी त्या गाडीतून उतरलेल्या आपल्या अनोळखी मुलाकडे पाहू लागली. पण आईची माया काही वेगळीच असते, तिने सुन्याच्या आवाज ऐकताच ओळखले. सुन्या जत्रेत चुकला होता तो आत्ताच भेटला होता. सुन्या शहरात सासऱ्याच्या मोठ्या कंपनीचा मालक झाला होता. कितीतरी कोटी रुपयांची एका दिवसात उलाढाल होत होती, पण गावाशी असलेली नाळ सुनीलशी आतापर्यंत जोडलेली होती. लहानपणी जत्रेत हरवलेले भाऊ आज कितीतरी दिवसांनी भेटले होते. त्यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू वाहू लागले.
 अगदी मळकट साडी नेसलेली मन्याची बायको व कोट्यवधी रुपयाचा मालक असलेल्या सुनीलची बायको एकमेकीकडे नुसत्या पाहत राहू लागल्या. आपल्या मन्या व सुन्या या दोन मुलांना छातीशी धरून  आकाशाकडे पहात लक्ष्मी बोलू लागली, "पहा धनी, आज पुन्हा एकदा आपले दोन्ही लेकरं मला भेटली, हा पहा सुन्या जत्रेत चुकला होता, आज कोट्यावधी रुपयाचा मालक आहे, पण गावाशी जोडलेली नाळ माझ्या दोन्ही लेकरांना गावात घेऊन आली..............."


कथाकार-राहुल रतन इंगोले,


मु.पो.पुसेगाव,ता.सेनगाव.जि.हिंगोली.
मो.नं.९७६७६६६१४८


***