डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाऊंडेशन नवी दिल्लीचा पुढाकार
परभणी - येथील सामाजीक कार्यकर्ते लॉयन्स वसंतराव धाडवे यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजीक कार्याची दखल घेवून डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाऊंडेशन नवी दिल्लीच्या वतीने राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान पुरस्काराने ४ जुन रोजी सन्मानित करण्यात आले. सामाजीक न्याय मंत्रालय भारत सरकार अंतर्गत विमुक्त, घुमंतु तथा अर्ध घुमंतु समुदाय विकास कल्याण बोर्डाचे अध्यक्ष भिकु रामजी इदाते, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे सदस्य तथा विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राज्यपाल नामित सिनेट सदस्य तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारप्राप्त डॉ. मनिष गवई यांच्या संयुक्त स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात हा पुरस्कार धाडवे यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात कार्यक़्रम घेण्यास मनाई असल्याने लॉकडाऊन संपल्यानंतर दिल्ली येथे आयोजीत कार्यक्रमात केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत व विशेष अतिथींच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून लॉ. धाडवे यांना हा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामध्ये लॉकडाऊनच्या दरम्यान देश, समाज आणि जनतेच्या प्रती आपली सामाजीक बांधीलकी समजून केलेल्या विधायक व सेवाभावी कार्याची दखल घेवून फाऊंडेशनच्या वतीने लॉ. वसंतराव धाडवे यांच्यासह भारतातील विविध व्यक्तींना कोरोना सेनानी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत आपले सामाजीक कर्तव्य समजून जिल्हयात वितरीत केलेल्या १० हजार माहितीपत्रकाव्दारे जनतेत करोना आजाराविषयी जनजागृती केली होती. शिवाय लॉकडाऊन काळात नागरीकांची उपासमार होवू नये याकरीता वारा जहांगीर व वाशीम येथील गटई कामगारांचे कुटुंब व गोरगरीब अशा ५७ परिवारांना जीवनावश्यक वस्तू, किराणा, अन्नधान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले होते. सोबतच जनतेच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालुन रस्त्यावर अहोरात्र सेवा देणार्या पोलीस विभागाच्या सुरक्षेसाठी ३० हजार रुपये किंमतीचे ५०० मुख आवरणे (फेसशिल्ड) देण्यात आले होते. तसेच पुण्यावरुन परत आलेल्या मजुरांना खिचडी पाकीटाचे वाटप करण्यात आले होते.
रंजल्या गांजल्यांमध्ये देव पाहण्याचे काम करणार्या लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाने सामाजीक बांधीलकी ठेवून अनेक होतकरु गरीबांना मदत केली. लॉ. धाडवे यांचे परभणी व वाशीम जिल्हयात उल्लेखनिय शैक्षणिक व सामाजीक कार्य असून येथील विविध सामाजीक संघटनांशी निकटचा संबंध आहे. त्यांना यापुर्वी सामाजीक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा संत नामदेव समाजगौरव पुरस्कार (नांदेड), डॉ. आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप (दिल्ली), आदर्श कामगार गौरव पुरस्कार (मुंबई), संत रोहीदास धन्वंतरी गौरव (कोल्हापूर), समाजभुषण पुरस्कार (पुणे), समाजरत्न पुरस्कार (लातूर), राज्यस्तरीय संत रोहीदास पुरस्कार (महाराष्ट्र शासन), विसावी शताब्दीरत्न पुरस्कार (हरियाणा), महाराष्ट्र गौरव (परभणी), राष्ट्रीय विकासरत्न (मुंबई), राष्ट्रीय समाजरत्न (शिर्डी), संत रोहीदास सामाजीक गौरव पुरस्कार (मुंबई), सेवागौरव पुरस्कार (परळी), नॅशनल ब्रेव्हरी अॅन्ड इंटर प्रेगेनिअर (दिल्ली), जीवनगौरव पुरस्कार (औरंगाबाद), गुरु रविदास समतागौरव पुरस्कार (बुलडाणा), राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार (शिर्डी) आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वसंतराव धाडवे सध्या राष्ट्रीय चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष, सामाजीक एकता मिशन नवी दिल्लीचे विश्वस्त, लॉयन्स क्लबचे प्रांतीय चेअरमन, जिल्हा रुग्णालय अभ्यांगत समिती सदस्य, विज ग्राहक संघटनेचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती आश्रमशाळा विकास मंचचे अध्यक्ष, जिल्हा पुरवठा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य आदी पदाच्या माध्यमातून सामाजीक कार्य करत आहेत. धाडवे यांनी आपल्या कार्यातून नेहमी रंजल्या गांजल्यांमध्ये देव पाहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
***